कर्जमाफी नको, शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमुक्ती हवी : ठाकरे पीक विमा कंपनीच्या मुंबई कार्यालयावर शिवसैनिक धडकणार

Foto

 औरंगाबाद: शिवसेनेच्या पहिल्या मदत केंद्राला भेट दिली आता राज्यभर फिरणार आहे. लोकसभेला गंगापूर वासीय नाराज का झालेत याचा विचार करावा लागेल. तुमचे कर्ज माफ झाले का, विमा मिळाला का असे असे शेतकर्‍यांना विचारले असता नाही असे उत्तर आले. मला शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त झालेला पाहायचा आहे तसेच  ज्या पीक विमा कंपन्या शेतकर्‍यांना विम्याची रक्कम देणार नाहीत त्यांच्या मुंबई कार्यालयावर शिवसैनिक धडकतील, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.

शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांनी बैलजोडी घेऊन उद्धव ठाकरे यांचा सत्कार केला. आमदार प्रशांत बंब यांनी गाय-वासरू भेट देऊन ठाकरे यांचा सत्कार केला. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, संपर्क नेते विनोद घोसाळकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे,  आ. मनीषा कायंदे, आमदार  संजय शिरसाट, आमदार प्रशांत बंब, महापौर नंदकुमार घोडेले,जिल्हाप्रमुख अंबादास दानवे नरेंद्र त्रिवेदी, सुहास शिरसाट, कृष्णा पाटील डोणगावकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी बोलताना उपाध्यक्ष देवयानी डोणगावकर म्हणाल्या की महाराष्ट्रात सर्वात जास्त टँकर गंगापूर तालुक्यात सुरू आहेत. जिल्ह्यात 400 कोटींचा खर्च टँकरवर झाला. गेल्या दहा वर्षापासून ही परिस्थिती आहे. या परिस्थितीतून बाहेर काढावे, अशी विनंती त्यांनी पक्षप्रमुख ठाकरे यांच्याकडे केली. बंद सिंचन प्रकल्प सुरू करावे. जायकवाडी धरणातून प्रकल्पांना पाणीपुरवठा करावा, असेही त्या म्हणाला. 340 जणाची टीम आणि 34 पथके शिवसेनेने तयार केली असून जिल्ह्यातील प्रत्येक सर्कलमध्ये पीक विमा मदत केंद्र सुरू करणार असल्याचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सांगितले. माजी खासदार खैरे म्हणाले की, खरीप हंगामात शेतकर्‍यांना विम्याचे पैसे मिळायला हवेत. त्यासाठी शिवसेना लढत असल्याचे ते म्हणाले.

पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, दुष्काळात बळीराजाच्या पाठिशी शिवसेना कायम उभी राहिली. मराठवाड्यात हजारो शेतकर्‍यांना सेनेने मदत केली. बँकांनी तातडीने शेतकर्‍यांना कर्ज वाटप करावे, असे ते म्हणाले.
गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू करण्यात आलेल्या पीक विमा भरणा मदत केंद्रास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी 12 च्या सुमारास भेट देऊन पाहणी केली. शेतकर्‍यांना पीक विमा भरण्यासाठी मदत व्हावी या उद्देशाने जिल्हाभर मदत केंद्रे सुरू केली आहेत. गंगापुरात बाजार समितीतील पीक विमा भरणा मदत केंद्राचे कालच उद्घाटन करण्यात आले. या मदत केंद्राला आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. लासूर येथील बाजार समितीच्या प्रांगणात शेतकरी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळी 11 च्या सुमारास सुरू होणार्‍या या कार्यक्रमाला तब्बल दोन तास उशीर झाला.

शिवसेनेत उत्साह
कार्यक्रमाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येणार असल्याने शिवसेनेत चांगलाच उत्साह दिसून आला. ग्रामीण भागातील कार्यकर्ते कार्यक्रमाला सकाळी 10 वाजेपासूनच उपस्थित होते. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, कृष्णा पा. डोणगावकर, बाळासाहेब थोरात, ऋषिकेश खैरे, सचिन खैरे यांच्यासह शहरातील अनेक पदाधिकारी, नगरसेवक कार्यक्रमाची तयारी करीत होते.

पोलिसांची हाराकिरी
बाजार समितीच्या आवारात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रचंड उकाडा होत होता.त्यामुळे मंडपात बसणेही अवघड झाले होते. मंडपातून लोक बाहेर जात होते तर खुर्च्यांवर बसलेले घामाच्या धारांनी त्रस्त झाले. अखेर जिल्हाप्रमुख दानवे यांनी मंडपाचे पडदे उघडण्याची सूचना केली. त्यानुसार शिवसैनिकांनी पडदे वर केले. मात्र, पोलिस अधिकार्‍यांनी पडदे उघडण्यास प्रतिबंध केला. यावेळी दानवे व पोलिस अधिकार्‍यांमध्ये बाचाबाची झाली. सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस पडदे बंद करीत होते तर शिवसैनिक पडदे उघडत होते. कितीतरी वेळ हा प्रकार सुरू होता. अखेर शिवसैनिकांच्या हट्टापुढे पोलिसांनी माघार घेतली. सुरक्षेच्या नावाखाली पोलिस मनमानी करीत असल्याचा आरोप यावेळी शिवसैनिकांनी केला. 

...तर शिवसेना स्टाईल आंदोलन : दानवे
खरीप हंगाम सुरू झाली तरी बँका शेतकर्‍यांना पीक कर्ज देत नसल्याच्या तक्रारी येत आहे. पीकविमा भरलेल्या शेतकर्‍यांनाही अद्याप मदत मिळालेली नाही. बँकांनी शेतकर्‍यांची कोंडी केली आहे. अधिकारी कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. बँकांनी शेतकर्‍यांना तातडीने पीक कर्ज द्यावे नसता शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना दिला.